सन १९६५ मध्ये परभणी जिल्ह्यात एकही नागरी सहकारी बँक नव्हती. स्थानिक गावकऱ्यांना बँक म्हणजे काय? अशी अवस्था होती. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक "जिंतूर अर्बन को-ऑप. बँक लि., जिंतूर " या नावाने माजी आमदार स्व. सुंदरलालजी सावजी साहेब यांनी दिनांक ३ जानेवारी, १९६६ रोजी जिंतूर सारख्या निमशहरी भागात या बँकेची सुरुवात करण्याचे धाडस केले. अवघ्या रु. ३५०००/- च्या भाग भांडवलावर सुरु झालेली बँक आज रु. ५८ कोटीचेवर भाग भांडवल जमा करून मराठवाड्या मध्ये अग्रस्थानी आहे.
"सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप. बँक लि., जिंतूर " पूर्वीची "जिंतूर अर्बन को-ऑप. बँक लि., जिंतूर" ग्रामीण भागात आर्थिक हातभार लावण्यासाठी स्थापन झालेली हि बँक, आज २४ शाखांच्या माध्यमातून ३,००,००० पेक्षा जास्त ग्राहकांना आर्थिक सेवा देत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकेची आर्थिक परिमाणावर सातत्याने वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे.
बँकेच्या प्रगतीचा ध्यास, हा ज्यांच्या श्वास होता असे बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुंदरलालजी सावजी साहेबांनी दिनांक २६ नोव्हेंबर, २००२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पश्चात बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मुकुंद सुंदरलालजी कळमकर यांचे नेतृत्वाखाली वाटचाल सुरु आहे. ठेवी संकलनाच्या बाबतीत आज हि बँक मराठवाड्यात पहिल्या क्रमंकावर आहे. याच यशस्वी कारकिर्दीची नोंद महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बॅंक्स असोसिएशनने घेतली. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा "सहकारनिष्ठ" पुरस्कार बँकेस सन २०१२ मध्ये प्राप्त झाला. तसेच महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स असोसिएशन तर्फे एकूण अठरा वेळा "पदमभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट बँक" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या बरोबरच बँकिंग फ्रंटियर्स या नियतकालिकेद्वारे दिला जाणारा बेस्ट ओव्हरऑल बँक अवार्ड, NAFCAB दिल्ली यांचेतर्फे दिला जाणारा व्हिजन २०-२० अवॉर्ड तसेच अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या "बँको" पुरस्काराने बँकेस चार वेळा गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे तीन वेळा पुरस्कार मिळाले आहे.
सहकार क्षेत्रात काम करीत असतांना सामाजिक बांधिलकीची जाणीव सदैव तेवत ठेवण्याची कामगिरी संचालक मंडळाने यथोचित पार पाडली. बँक स्थापने पासून ऑडिट वर्ग "अ" मध्ये आहे. एन.पी.ए. ०% असून बँकेची कमी थकबाकी हि बँकेच्या आर्थिक सृदृढतेचे लक्षण आहे.
बँक स्वतःच्या सक्षमते बरोबरच समाजातील दुर्बल व मागासलेल्या घटकांसाठीही कार्यरत आहे. बँकेतर्फे अल्पसंख्यांक व मागासवर्गीय गरजू व्यक्तींना छोट्या छोट्या रक्कमेचा कर्ज पुरवठा केला जातो. उदा. चर्मकार, सुतार, पानस्टॉलधारक, बेकरी, हेअर कटिंग सलून, भाजी विक्रेते इत्यादींना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आर्थिक हातभार लावलेला आहे.
बँकेतर्फे शहरातील नागरिकांना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना बचत ठेवीची सवय लागावी यासाठी शहरात अल्प बचत योजना राबविण्यात येते. लगतच्या ग्रामीण भागात सहकार चळवळ प्रसारासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येत असतात. सहकार गीताचे प्रसिद्धीसाठी सहकार गीताचे डिजिटल बॅनर्स बँकेच्या शाखा, नगरपालिका, शाळा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व मा. सहकार आयुक्त कार्यालय, पुणे येथे प्रदर्शित करण्यात आले होते.
शासनाचे अपारंपरिक ऊर्जास्रोत वापराचे धोरण बँकेने यशस्विरित्या राबविले आहे. बँकेने शाखा हिंगोली व शिवाजी नगर परभणी येथे सोलार सिस्टीम बसवून वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्यांवर मात केली आहे.
बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून गोशाळा, ग्रंथालय, समाजातील आर्थिक दुर्बल व्यक्तींना औषोधोपचारासाठी आर्थिक मदत केलेली आहे. तसेच सन २००३ पासून बँकेचे संस्थपाक अध्यक्ष स्व. सुंदरलालजी सावजी साहेब यांचे स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. सदर व्याख्यानमालेस समाजातील विविध क्षेत्रातील (उदा. शास्त्रज्ञ, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, किर्तनकार इ.) मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. तसेच आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. सदर व्याख्यानमालेस समाजातील विविध क्षेत्रातील (उदा. मा. सरोजताई देशपांडे, मा.डॉ. सुधा कांकरीया अहमदनगर, मा. डॉ. सौ. अनुराधा तोटे अमरावती इ.) मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळेस एकूण ६५० रक्तदात्यांची रक्तदान केले. तसेच वाचन संस्कृती जिवंत राहावी या उद्देशाने बँकेच्या विविध शाखांमध्ये "ग्रंथ तुमच्या दारी" उपक्रम सुरु केलेला आहे.
सुज्ञान सभासद वर्ग व कृतीशिल कर्मचारी या सर्वांच्या ध्येयाधिष्ठित वर्तणुकीमुळेच आज हे दिवस या सहकारी बँकेस बघण्यास मिळाले, भारतातील १६०० नागरी बँकेत पहिल्या १०० बँकेत या बँकेने स्थान मिळवले आहे.